उमरठ-तानाजी मालुसरे समाधी 

जिल्हा - रायगड

श्रेणी  -  सोपी

प्रकार-  समाधी 

महाराष्ट्रातील ‘उमरठ’ या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या येथे असलेल्या समाधीमुळे हे ठिकाण आज धारातीर्थ बनले आहे. तानाजी मालुसरे नाव घेतले की आपल्याला आठवतो तो सिंहगडचा पराक्रम सोबत आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे, गड आला पण सिंह गेला या सारखी शाहिरांनी प्रसिद्ध केलेली वाक्ये. सिंहगडावर केलेल्या पराक्रमामुळे मराठी माणसांच्या हृदयात कोरलेला हा वीर स्वराज्य स्थापनेपासुन अनेक घटनांमध्ये महाराजांसोबत होता. अफजलखान स्वारीच्या वेळी ज्या निवडक सरदारांनी जावळीची नाकाबंदी केली त्यात तानाजी मालुसरे होते. सुभेदार तानाजींनी जावळीच्या जंगलात खानाच्या फौजेचा धुव्वा उडवला होता. महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज केल्यावर तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे बंदोबस्तावर ठेवले होते. या संगमेश्वरी मुक्कामी असतांना शृंगारपुरच्या सुर्यराव सुर्वे याने सैन्यावर अचानक हल्ला केला असता हल्ल्याने खचलेल्या पिलाजी निळकंठराव यांना पराक्रम म्हणजे काय ते दाखवून दिले. शिवरायांनी लालमहालात शाहिस्तेखानावर केलेल्या हल्ल्यात महाराजांसोबत तानाजी मालुसरे यांचा देखील समावेश असावा. घरातील मंगलकार्य बाजुला ठेऊन सिंहगड स्वराज्यात आणण्यासाठी त्यांनी केलेला पराक्रम व बलिदान मराठयांच्या इतिहासात अजरामर झाले आहे. माघ वद्य अष्टमी शके १५९१ म्हणजेच ४ फेब्रुवारी १६७० रोजी रात्री तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर वीरगती प्राप्त झाली. सिंहगडावर त्यांचा 'वीरगळ' बसवलेला असून सोबत अर्धपुतळा स्थापन करून एक सुंदर स्मारक उभारलेले आहे. त्यांच्या मृत्युनंतर त्याचे शव ज्या मार्गाने उमरठ गावी आणले गेले तो घाट आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. पेणचे इतिहास संशोधक श्री. प.रा. दाते यांचे तानाजी मालुसरे चरित्र व श्री. शशिकांत श्रीखंडे यांचे गाऊ त्यांना आरती भाग -४ या पुस्तकातील माहीतीनुसार सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यात पाचगणी जवळ असलेल्या गोडवली गावातील काळोजी मालुसरे यांचे तानाजी व सुर्याजी हे दोन मुलगे. काहींच्या इतिहासकारांच्या मते तानाजीचा काका भोरजी याने काळोजीचा खून केला तर काहींच्या मते आदिलशाही सुभेदाराकडून काळोजी व भोरजी मारले गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर ते आईच्या माहेरी म्हणजे मामा कोंढाजी रामजी शेलार (शेलारमामा) यांच्याकडे उमरठ गावी आले. त्यानंतर हे गावच त्यांचे कर्मभुमी बनले व याच गावात त्यांनी चिरविश्रांती घेतली. सुभेदार तानाजी मालुसरे यांना गावाच्या सीमेवर ज्या ठिकाणी अग्नी दिला गेला त्या ठिकाणी चौथरा व त्यावर त्यांची समाधी उभारण्यात आली. या समाधीत अजून एक शिळा असून ती शेलारमामा यांची असल्याचे मानले जाते. श्री.केशवराव लिमये १९६२-१९६७ दरम्यान कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी येथील समाधीचा जीर्णोद्धार करून घेतला. त्यानंतर २०१९ साली अजय देवगण याच्या तानाजी या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर या समाधीचा दुसऱ्यादा जीर्णोद्धार करण्यात आला. प्रसिद्धीचे वलय लाभल्यानंतर स्मारकाकडे लक्ष जाणे हीच आपली खरी शोकांतिका आहे. चौथऱ्यावर असलेल्या समाधीशेजारी काही अंतरावर जननीमाता कुंभळजाई देवीचे जुने मंदिर आहे. गावात समाधीपासुन काही अंतरावर असलेल्या सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या उध्वस्त घराच्या जागी त्यांचे स्मारक उभारलेले असून या स्मारकात त्यांचा पुर्णाकृती पुतळा उभारलेला आहे. गावकऱ्यांकडून या पुतळ्याची नित्यनेमाने पूजा केली जाते. या स्मारकाजवळ असलेल्या घराच्या अंगणात एका लहान चौथऱ्यावर अखंड दगडात कोरलेली कोरीव समाधी पहायला मिळते पण ती नक्की कोणाची आहे हे गावकऱ्याना देखील सांगता येत नाही. स्मारकासमोर असलेल्या दुकानदाराकडे एक मराठा तलवार व एक पट्टा पहायला मिळतो. तानाजी म्हणजे सिंहगड हे जरी खरे असले तरी उमरठ गावी असलेले त्यांचे स्मारक व समाधी आपण विसरता कामा नये. स्वराज्यासाठी प्राणार्पण केलेल्या या नरवीरांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या पराक्रमाची ज्योत तेवत ठेवणे आपले कर्तव्य आहे. रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर तालुक्यात असलेल्या या गावात जाण्यासाठी पोलादपुर-कापडेफाटा -उमरठ असा गाडीमार्ग आहे. मुंबई-पोलादपूर हे अंतर १८५ कि.मी. असुन पोलादपूर- महाबळेश्वरला मार्गावर ६ कि.मी.वर कापडे फाटा आहे. या फाट्यावरून १० कि.मी.वर तानाजी मालुसरे यांची समाधी असलेले उमरठ गाव आहे. पोलादपुर येथुन उमरठ येथे येण्यासाठी दिवसाला ४ बस आहेत.------------------सुरेश निंबाळकर