मेडद 

जिल्हा - पुणे 
श्रेणी  -  सोपी   
दुर्गप्रकार - भुईकोट

मराठेशाहीच्या उत्तरकाळात पेशवे जरी सत्तेच्या केंद्रस्थानी असले तरी त्यांच्या वर्चस्वाखाली महाराष्ट्रात इतरही काही संस्थानिक निर्माण झाले होते. या संस्थानिकांनी त्यांच्या प्रदेशात बरेच भुईकोट व गढ्या बांधल्या. यातील बरेच भुईकोट वाडे हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करण्यासाठी व स्वसंरक्षणसाठी होत होता. या भुईकोटाचा फारसा वापर न झाल्याने व लवकरच इंग्रजांचे राज्य भारतावर आल्याने इतिहासात या कोटांची फारसी माहिती दिसुन येत नाही. खाजगी मालकीचे हे भुईकोट व वाडे आज मोठया प्रमाणात उध्वस्त झाले असुन इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. असाच एक उध्वस्त भुईकोट म्हणजे मेडदचा भुईकोट. काही काळाचा सोबती असलेल्या ह्या भुईकोटाचे साक्षीदार होण्यासाठी त्याला लवकरात लवकर भेट दयायला हवी. मेडदचा भुईकोट बारामती तालुक्यात मोरगाव –बारामती रोडवर असुन बारामती मेडद हे अंतर ५ कि.मी. तर पुणे मेडद हे अंतर ९२ कि.मी. आहे. किल्ल्यात शिरण्यापूर्वी किल्ल्याबाहेर एका चौथऱ्यावर बांधलेले यादवकालीन शिवमंदीर आपले लक्ष वेधुन घेते. संपुर्ण दगडी बांधणीतील हे मंदीर किल्ला बांधण्यापुर्वी अस्तित्वात असावे. मंदिर पाहुन कोटाच्या दरवाजाकडे जाताना वाटेत चुन्याच्या घाण्याचे चाक दिसते. आयताकृती आकाराचा हा किल्ला पुर्वपश्चिम १.५ एकर परिसरात पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत चार टोकाला चार तटबंदीच्या मध्यावर दोन व दरवाजा शेजारी दोन असे एकुण आठ बुरुज आहेत. कधीकाळी दुमजली असलेले ह्या वैशिष्टपूर्ण आकाराच्या बुरुजांचा वरील भाग ढासळलेला असुन केवळ एका बुरुजाचा वरील भाग पहायला मिळतो. कोटाच्या पुर्वाभिमुख दरवाजातून आत आल्यावर तटबंदीच्या आतील दोन्ही बाजूस देवड्या पहायला मिळतात. यातील एका देवडीशेजारी तटबंदीतुन बाहेर पडण्यासाठी लहानसा भुयारी मार्ग आहे. हा मार्ग दरवाजा शेजारील बुरुजातून बाहेर पडतो. कोटाचे लाकडी दरवाजे आजही शिल्लक असुन मुख्य दरवाजाला दिंडी दरवाजा आहे. संपुर्ण कोटाची बांधणी घडीव दगडात केलेली असुन फांजीवरील भाग मात्र विटांनी बांधुन काढलेला आहे. तटबंदी व बुरुजात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. भुईकोटाच्या आत ग्रामपंचायत कार्यालय तसेच ग्रामपंचायतीची शाळा असुन आतील वास्तु पुर्णपणे भुईसपाट करून खेळाचे मैदान बनवीले आहे. कोटाची आतील तटबंदी ढासळली असल्याने फांजीवरून फेरी मारता येत नाही पण कोटाच्या दरवाजावरील भागात मात्र जाता येते. येथुन संपुर्ण किल्ला नजरेस पडतो. कोटाच्या दक्षिण बाजुच्या तटबंदीतुन बाहेर जाण्यासाठी एक लहान दरवाजा बांधला आहे. कोटाच्या आजही शिल्लक असलेल्या बुरुजाच्या आत एक तळघर असुन त्याचा वापर दारुगोळा ठेवण्यासाठी अथवा सैनिकांच्या रहाण्यासाठी होत असावा. किल्ल्याच्या आवारात असलेली आजमितीस एकही विहीर दिसुन येत नाही. खेळाचे मैदान बनविताना विहीर बुजवली असावी कारण एका ठिकाणी दगडी बांधकामातील गोलाकार आकाराचा पाणी मुरून झालेला खड्डा दिसतो. याशिवाय कोटात एकही अवशेष दिसुन येत नाही. आटोपशीर असा हा भुईकोट पहाण्यासाठी १५ मिनिटे पुरेसी होतात.--------------------सुरेश निंबाळकर