जिल्हा - जळगाव  
श्रेणी  -  सोपी
दुर्गप्रकार- भुईकोट

जळगाव जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत पाल हे अभयारण्य व थंड हवेचे ठिकाण म्हणुन प्रसिध्द आहे. रावेर तालुक्यात यावल वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत येणारे हे निसर्गरम्य ठिकाण लोकांना पर्यटनस्थळ म्हणुन प्रचलित असले तरी येथे असलेला किल्ला मात्र कोणालाच माहित नाही. अगदी स्थानिक लोकांना देखील हा किल्ला माहित नाही. पाल हे गाव भुसावळपासुन ४८ कि.मी यावलपासुन ४३ कि.मी. तर रावेरपासुन २२ कि.मी अंतरावर आहे. पाल किल्ल्याची तटबंदी व बुरुज पुर्णपणे नष्ट झाले असुन वनखात्याच्या विश्रामगृहाच्या आवारात असलेला एकमेव ढासळलेला बुरुज पहायला मिळतो. या बुरुजापासून काही अंतरावर असलेला किल्ल्याचा दरवाजा आज शिल्लक असला तरी वनखात्याने त्याची मूळ ओळख बुजवुन त्याला नवीन रूप दिले आहे. गावातुन विश्रामगृहाकडे जाताना वाटेच्या उजव्या बाजूस एक जुनी मशीद पहायला मिळते. साधारण २५ x २५ फुट आकाराची हि मशीद पुर्णपणे दगडात बांधलेली असुन मशिदीच्या आवारात ५ कबर पहायला मिळतात. मशिदीसमोर दगडी कमान असुन मशिदीवरील भागात तीन घुमट बांधलेले आहेत. मशिदीच्या मागील भागात २००x२१० फुट आकाराची चौकोनी दगडी तटबंदीने बंदिस्त केलेली जागा असुन या संपुर्ण तटबंदीला आतील बाजुने चौथरा आहे. या वास्तुत जाण्यासाठी असलेला उत्तराभिमुख दरवाजा व त्यावरील कमान आजही सुस्थितीत असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस दगडात बांधलेल्या पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. यातील एक देवडी पुर्णपणे ढासळली असुन तटबंदीत असलेल्या वासे अडकविण्याचा खुणा पहाता या संपुर्ण तटबंदीला लागुन दुमजली वस्तु असावी पण या वास्तुचे नेमके प्रयोजन ध्यानात येत नाही. स्थानिक लोक या ठिकाणाला हत्तीखाना म्हणुन ओळखतात. पश्चिम दिशेला असलेल्या तटबंदीत इदगाह असुन या तटबंदीबाहेर एक मोठी कबर पहायला मिळते हि बहुदा राजघराण्यातील व्यक्तीची कबर असावी. गावात फिरताना पुरातन महादेव मंदीर पहायला मिळते. हा संपुर्ण परीसर फिरण्यास एक तास पुरेसा होतो. आभीरांचे राज्य असताना येथे त्यांचे स्थानिक मुख्यालय होते. पुढे सत्तेत आलेल्या फारुकीचे देखील येथे ठाणे असावे. ब्रिटीशांनी या भागाचा ताबा घेतला तेव्हा मात्र हा किल्ला ओस पडल्याचे त्यांनी नमूद केले आहे. -----------------सुरेश निंबाळकर

पाल

DIRECTION