​​​​​​​जिल्हा - गोवा 
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार - सागरी किल्ला
  

अग्वाद हा एक पोर्तुगीज शब्द. अग्वादचा अर्थ पाणी भरण्याची जागा. पोर्तुगीज काळात येथे जहाजामधे पाणी भरण्यासाठी जवळपास २४ लाख गॅलन पाणी साठवले जात असे. या किल्ल्यात १७ खांबावर उभी असलेली ही पाण्याची भुमिगत टाकी त्याकाळी खूप महत्त्वाची होती. पोर्तुगालहून येणाऱ्या जहाजांचा हा भारतातला थांबा असायचा त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी हा किल्ला व किल्ल्यात टाकी बांधली होती. किल्ल्यावरून खोल समुद्रात दुरवर व चारही बाजूला व्यवस्थित नजर ठेवता येत असल्याने किनाऱ्यावर येणाऱ्या पोर्तुगीज जहाजांना संरक्षण मिळत असे. तांबड्या चिऱ्याने बांधलेला हा किल्ला आजही वारा पावसाशी टक्कर देत दिमाखात उभा आहे. सलग ४०० वर्ष हा किल्ला पोर्तुगीज अधिपत्याखाली होता. पोर्तुगीज काळात ह्या किल्ल्यावर कोणाचा हल्ला वगैरे झालेला नाही. गोवा मुक्ती संग्रामानंतर पोर्तुगीज गेल्यावर १९६२च्या सुमारास हा किल्ला भारतीय राज्यात सामील झाला. या किल्ल्याच्या बांधकामाची तुलना सह्याद्रीतील दगडी किल्ल्यांशी करता हा किल्ला एकदम तकलादू वाटतो. तोफेचा भडीमार केल्यास तटबंदी सहज कोसळून पडेल असे वाटत असले तरी याच किल्ल्याच्या भरवशावर गोव्याच्या किनाऱ्यावर येणाऱ्या जहाजावर नजर ठेवण्याचे काम पोर्तुगीज करत हो्ते. अग्वाद किल्ला मांडवी नदीच्या मुखावर असुन इथून पुढे मांडवी नदी अरबी समुद्राला मिळते. किल्ल्याच्या दरवाजापर्यंत गाडीरस्ता असल्याने आपण सहजपणे तटबंदी जवळ पोहोचतो. किल्ल्याच्या सभोवताली असलेला रिकामा खंदक ओलांडून दरवाजातून आत गेल्यावर समोरच मोकळे मैदान मध्यभागी टाकी आणि चारही बाजूला तटबंदी दिसते. किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी जमा करण्यासाठी किल्ल्याच्या आतील भागातील जमीन जांभा दगडाने बांधुन काढलेली असुन या जमिनीला टाकीच्या दिशेने उतार दिलेला आहे. जमिनीवर चिरे बसवलेले असल्याने कुठेही उघडी जमीन दिसत नाही आणि किल्ला एकदम स्वच्छ वाटतो. ह्या किल्ल्याचा उपयोग पाणी व दारूगोळा साठविण्यासाठी केला जायचा. किल्ल्याच्या आत असणारी दारूगोळ्याची कोठारं मोठया प्रमाणात तुटलेली आहेत असुन त्यांचे अवशेष पहायला मिळतात. किल्ल्याची तटबंदी आजही सुस्थितित असुन पाण्याची टाकी व खंदक खोदताना निघालेला दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला गेला.किल्ल्याच्या एका बाजूला मुख्य दरवाजाजवळ उभा असलेला १६व्या शतकातील लाईट हाऊस टॉवर दिसतो. या टॉवरवर जाण्यास परवानगी नाही. दरवाजातून आत आल्यावर समोरच तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या आहेत. तटबंदीवरून संपुर्ण गडाला फेरी मारता येते. किल्ल्याची लांबीरुंदी ४५० x ३५० फुट असुन एकुण क्षेत्रफळ अडीच एकर आहे. किल्ल्याची तटबंदी काही ठिकाणी चार फुट रुंद तर काही ठिकाणी सहा फूटापेक्षा जास्त रुंद आहे. किल्ल्याला एकुण पाच बुरुज असुन किल्ल्यात एकही तोफ दिसुन येत नाही. किल्ल्याला अतीरीक्त सरंक्षण मिळावे यासाठी किल्ल्याच्या चारही बाजूंनी खंदक खणलेला आहे. किल्ला सुरक्षित करण्यासाठी किल्ल्याच्या तटबंदीला समांतर असलेल्या खंदकावर दुसरी तटबंदी बांधलेली आहे. किल्ल्याच्या तटबंदीची एक भिंत खाली समुद्रापर्यंत गेली आहे पण या भागात कारागृह असल्याने तेथे जाण्यास परवानगी नाही. किल्ल्याच्या उजव्या बाजूला समुद्राच्या पाण्याने झिजलेला खडकाळ किनारा आणि सिक्वेरीम बिच दिसतो. तटबंदीवरून फिरताना एकीकडे मांडवी नदीचे पात्र तर दुसरीकडे फेसाळणाऱ्या अरबी समुद्राचे विराट रुप पहायला मिळते. संपुर्ण किल्ला फिरण्यास एक तास पुरेसा होतो. पोर्तुगीज सत्तेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणारा हा किल्ला गोव्याला गेल्यावर एकदा तरी भेट देण्यासारखा आहे. -----------------सुरेश निंबाळकर

​​​​​​आग्वाद - गोवा